खैबरमधील पोलिस चौकीवर दहशतवादी हल्ला   

चकमकीनंतर दहशतवादी पळाले

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पोलिसांच्या एका चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला करणयाचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्याचे कारस्थान पोलिसांनी उधळून लावले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील पर्वतीय भागात शांगला येथे पोलिस चौकी आहे.  शुक्रवारी रात्री दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. सतर्क पोलिसांनी तो उधळैून लावल्याची माहिती पोलिस महासंचालक झुल्फीकार हमीद यांनी दिली. ते म्हणाले, दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी हलक्या आणि अवजड शस्त्रांचा वापर केला. प्रति हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून दहशतवादी पळाले. या वेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला होता. कोणताही दहशतवादी हल्ला परतावून लावण्याची धमक पोलिसांमध्ये असून त्यांचे मनोधैर्य वाढले असल्याचे ते म्हणाले.
 
दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात सुरक्षा दल आणि पोलिसांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे.  बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात बंडखोर आणि दहशतवादी वारंवार सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करत आले आहेत. त्यामध्ये चौक्या, वाहनांचा ताफा  यांचा समावेश आहे. शांगला येथील चौक्या दुर्गम पर्वतीय भागात आणि जंगलाने वेढलेल्या असल्याने तेथे वारंवार दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्यापैकीच हा एक हल्ला असल्याचे मानले जात आहे. 

Related Articles